मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली आर्थिक निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले. या निर्णयांचा भारताच्या जनतेच्या खिशावर परिणाम होत असून, मध्यमवर्गीयांची सरकारला फिकीर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राऊत यांनी वाढत्या जीडीपीच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण बेरोजगारी, शेतकर्यांच्या आत्महत्या आणि उद्योगांची दुरवस्था ही वास्तविक स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
एका जुन्या घटनेचा संदर्भ देत राऊत यांनी मातोश्रीवरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. यामागे काही बेवडे, उरबडवे आणि एक नेपाळी कनेक्शन असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगावरही त्यांनी ताशेरे ओढले, तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या पक्षांची चिन्हे गोठवून मतदारांच्या नावांची अदलाबदल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरात लाखो मतदारांची नावे गायब होत असून, सरकारला पाहिजे तेच मतदान करू शकतील, असे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.